ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग २० : डाळिंब


) डाळिंब (Pomegranate)


 " बटवे नम: । दाडिमीपत्रं समर्पयामि ।।"



वैशिष्ट्य :


डाळिंब म्हणजे सर्जनचे प्रतिक, भरभराटीचा, वैभवाचा संकेत. ईश्वराचा प्रेषित महंमदयाने आपल्या अनुयायांना डाळिंब भक्षण करण्याचा सल्ला दिला होता, कारण त्यामुळे सैतान लांब राहतो.


पारशी समाजात डाळिंबाच्या फांद्यांपासून पवित्र झाडू तयार करतात. त्यांच्या व्रतबंध समारंभात डाळिंबाच्या दाण्याच्या अक्षदा उधळतात. त्यामुळे दृष्ट शक्ती दूर होतात अशी मिथीका आहे. अंतिम घटका मोजणाऱ्याच्या मुखात डाळिंबाचा रस घालतात.



सर्वसाधारण वर्णन :
  
डाळिंबाचे झाड हे एक छोटेखानी गोलाकार झुडूप असते. डाळींबाचा वृक्ष ३ ते ५ मीटर उंचीचा, धुरकट तांबड्या रंगाचा बुंधा असलेला असतो. त्याच्या निमुळत्या कडक फांद्या अनुकूचिदार असतात. बुंधा / खोड उभे, तांबूस तपकिरी असते. नंतर ते राखाडी होते. त्याचे काही वाण सदाहरित तर काही पानगळी प्रकारचे आहेत. पाने काहीशी झुबक्यांनी येतात. ती आकाराने ५ ते ७ सें. मी. लांब, काहीशी भाल्यासारखी, अरुंद, चकचकीत आणि चिवट असतात. कोवळी पालवी तांबूस हिरवी असते. पण पाने जरा जून होताना हा रंग गडद होत जातो.

डाळींबाच्या फुलाची कळी म्हणजेच अनारकली. लालसर छटा असेलेली भगवी/शेंदरी फूले चांगली मोठी असून ती फांद्यांच्या टोकाशी येतात.

फळे गडद लाल रंगाची, सुमारे ५ सें. मी. व्यासाची असतात. यात लाल रंगाचे पाणीदार व गोड दाणे असतात. साल कठीण व जाड असते. फळात अनेक बिया असतात. प्रत्येक बी भोवती तांबूस तजेलदार मांसल आवरण असते. फळ परिपक्व झाले की ते हसते म्हणजेच उकलते. डाळिंबाची फळे खातात. बिया सुकवून त्यापासून मसाला करतात.


औषधी उपयोग :

झाडाचा प्रत्येक भाग म्हणजे डाळींबाच्या फळातील दाण्यांचा रस, फळाची ओली अथवा वाळलेली साल, फूले आणि मूळ यांचा औषधी म्हणून उपयोग केला जातो. डाळिंब हे फळ पित्तशामक आहे. याची साल नुसती तोडात ठेवली तरी खोकला आटोक्यात राहतो. उष्णतेच्या विकारांवर डाळिंब अतिशय उपयुक्त आहे. अग्नी दीपन करणे, पचन सुधारणे, व अतिसाराचा नाश करणे हे त्याचे प्रमुख गुण असून गळ्याचे विकार, मुख रोग, तृष्णा, दाह, ज्वर व अतिसार या रोगांचे ते नाशक असते. डाळींबाच्या सालीत तुरट रसामुळे सूज कमी करणे, जंतूनाशक, जखम शुद्ध करून ती भरून आणणे हे गुण असतात. लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे करण्यासाठी होतो.


लोककथा :


कडक उन्हाळ्याचे दिवस होते. एकदा एक राजा आपल्या राज्यातील दूरवरच्या एका प्रदेशाला भेट देण्यासाठी घोड्यावरून निघाला. राजाला भयंकर तहान लागली. तेवढ्यात त्याला एकडाळिंबाचीबाग दिसली. राजाने तिथल्या माळ्याला विचारले, "मला थोडा डाळिंबाचारस मिळेल का?" त्यावर माळ्याने एक पिकलेले डाळिंब तोडले व ते घेऊन तोबागेच्या कोपऱ्यात असलेल्या आपल्या झोपडीकडे गेला. थोड्याच वेळात राजास डाळिंबाचा लाललाल ताजा रस मिळाला. राजाची तहान भागली. मग तो बागेकडे, त्यातील डाळिंबाच्या झाडांकडे चौफेर निरखून पाहू लागला. सगळीकडे डाळिंबाची झाडे बेफाम वाढलेली दिसली. मग राजाने माळ्याला विचारले, "ही डाळिंबे विकून तुम्हाला किती नफा होतो?" माळ्याने भाबडेपणाने सांगितले, "तीनशे दिनार मिळतात मला". त्यावर राजाने विचारले, "ठीक आहे. तर मग राजाच्या कर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याला तुम्ही त्यापैकी किती देता?" माळी उत्तरला, "नाही, काहीच नाही. धान्य उत्पादन करणाऱ्यावरच फक्त राजाचा १०% कर आहे. फळांच्या लागवडीवर करच बसवलेला नाही." डाळिंबाच्या झाडांची ती विपुल झाडे पाहून राजाच्या मनात आले, "बागेतील उत्पन्नावर सुद्धा आपण कर बसवला पाहिजे. साऱ्या राज्यभर मिळून अश्या कितीतरी बागा असतील." आपल्या मनात आलेल्या या विचाराने राजाला बरे वाटले. ताबडतोब राजधानीत जाऊन असे करावे या विचाराने त्याने घोड्यावर मांडही ठोकली. इतक्यात काही विचार येऊन तो पुन्हा खाली उतरला व पुन्हा डाळिंबाचा रस देण्याबाबत माळीबाबांना सांगितले.

डाळिंबाच्या झाडावरून आघाशीपणे फिरणारे राजाचे डोळे पाहून राजाच्या मनात काय चालले आहे याची कल्पना माळीबाबांना आली असावी. तो पुन्हा आपल्या झोपडीत गेला व रस घेवून आला. मात्र यावेळी आणलेला रस खूप थोडा होता. राजाला आश्चर्य वाटले. राजाने विचारले, "एवढाच रस?" तेव्हा माळीबुवा उत्तरले, "महाराज आपण मघाशी जेव्हा डाळिंबाचा रस मागितलात, डाळिंबानेही उदारपणे आपल्याला रस दिला. एकाच डाळिंबात त्यामुळे आपल्याला काठोकाठ कप भरून रस मिळाला. आता मात्र मी पाच डाळिंबे तोडली. पण रस मात्र एवढाच निघाला." "माळीबुवा जरा स्पष्ट करून सांगता का तुम्हाला काय म्हणायचे आहे ते" राजाने विचारले, "अगदी सोपं आहे ते, महाराज," माळीबुवा म्हणाले "आमच्या राजाचं मन फार मोठे आहे तो फळझाडे हवी तशी वाढून देतो. सगळ्यांनाच त्या फळांचा हिस्सा मनमोकळेपणाने मिळतो. झाडालाही माहित असते की, आपल्यामागे राजाचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे झाडेही आपल्या फळातून विपुल रस देतात. पण आज राजाच्या मनात आले की, फळांवर कर बसवावा! डाळिंबाच्या झाडाच्या ते लक्षात आले! त्यामुळे आपल्या मागील राजाचा आशीर्वाद संपला आहे असे त्याला वाटले व त्याला रस आटला"

राजाला आपल्या मनात आलेल्या लोभी विचारांची लाज वाटली व फळझाडांवर कर लादण्याची कल्पना त्याने मनातून काढून टाकली. त्याच्या मनावरच भार हलका झाला. राजाच्या मनोवृत्तीत पडलेला बदल माळीबुवांनी बरोबर हेरला. राजाने आणखी रस देण्यास सांगितले. या वेळचा रसाचा कप मात्र लाल ताज्या रसाने काठोकाठ भरून आलेला होता. राजाने माळ्याचे आभार मानले आणि तो घोड्यावर बसून निघून गेला.  (कथा संदर्भ :आपले वृक्ष कुळकथा आणि लोककथा - मनेका गांधी)
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters